Sunday, February 3, 2013
Friday, February 1, 2013
पोलिओ संपलेला नाही
पोलिओ संपलेला नाही

पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू बालकांच्या शरीरात
अन्न-पाण्याद्वारे शिरतो आणि त्याचा मेंदू, मज्जारज्जू, चेतातंतू यांना बाधित करून
त्याचे पाय कायमचे पांगळे करून टाकतो. हा आजार झाल्यास बालकाचे पांगळेपण टाळायला
कुठलाही औषधोपचार नाही आणि त्यामुळेच हा आजार होण्याआधीच योग्य प्रकारे प्रतिबंधक
लस घेतली तर हा आजार टळू शकतो. लसीकरण हाच या आजारावर मात करण्याचा मूलमंत्र आहे
हे जगभर सिद्ध झाले आहे.
प्राचीन इजिप्त देशाच्या इतिहासात पोलिओची नोंद आहे.तेंव्हापासून
आतापावेतो लाखो बालकांना या आजाराने पांगले केले आणि तितक्याच बालकांना प्राण
देखील गमवावे लागले. १९८५ पासून जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल,
सी.डी.सी. आणि जगभरातली सरकारे यांच्या अथक एकत्रित प्रयत्नाने, जो आजार अमेरिके
सारख्या प्रगत देशापासून आफ्रिकेतल्या अतिशय गरीब आणि आशियातल्या युद्धग्रस्त देशांपर्यंत
पसरला होता, तो आज फक्त मोजक्या तीन
राष्ट्रातच शिल्लक राहिला आहे. १९८८ साली जगभरात
एकूण १२५ देशातली साडेतीन लाख बालके व्याधिग्रस्त होती तर २०१२ मध्ये फक्त पाकिस्तान,
अफगाणिस्तान आणि नायजेरिया या तीन देशातच हा
रोग शिल्लक राहिला आहे, आणि फक्त काही शेकड्यात याची व्याप्ती उरली आहे.
१९९५ पासून नेटाने सुरू झालेल्या प्रयत्नात आपण कधी यशस्वी होऊन
पोलिओचे रुग्ण कमी होत होते, तर अचानक बिहार,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश राजस्थान या
राज्यामध्ये वाढून एक चिंतेचे वातावरण निर्माण होत होते. परंतु,१३ जानेवारी २०११ पासून
गेल्या एकवीस महिन्यात भारतात पोलिओचा एकदेखील रुग्ण आढळलेला नाही. २५ फेब्रूवारी
२०११ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नांव
वगळले. ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने विशेषतः साऱ्या पोलिओच्या कार्यकर्त्यांच्या
दृष्टीने जाज्वल्य अभिमानाची घटना आहे. यामध्ये पोलिओ निर्मूलनासाठी काम करणारे
सर्व सरकारी डॉक्टर्स, कर्मचारी, आंगणवाडी कार्यकर्ते, रोटरीचे लाखो स्वयंसेवक,
धार्मिक संघटना आणि त्यांचे उर्ध्वयू यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
पंचवीस-सव्वीस वर्षांच्या पोलिओ निर्मूलनाच्या निरपेक्ष आणि निस्वार्थी चळवळीमधूनच
हे साध्य होऊ शकले आहे.
पण सावधान!! पोलिओ संपलेला नाही. आज जगाच्या पाठीवर काही देशांमध्ये
तो अस्तित्वात आहे. पोलिओचा विषाणू, जो पर्यंत या पृथ्वीतलावरून नष्ट होत नाही तो
पर्यंत हा लढा आपण लढणं नितांत गरजेचे आहे. ताजिकिस्तान आणि चीन या सारख्या देशात
अनेक वर्षे हा आजार लुप्त झाला, तिथल्या जनतेने निश्वास टाकला, पण पुन्हा पोलिओने
तिथे उठाव केला आणि असंख्य बालके नुसती पांगळीच नाही; तर मृत्युमुखीदेखील पडली. नोव्हेंबर २०१० मध्ये ताजिकिस्तान आणि सप्टेंबर
२०११ मध्ये चीनमध्ये, अंतर्धान पावलेल्या या विषाणूंनी पुन्हा उद्रेक केला आणि
शेकडो बालकांना पोलिओने अपंग केले आणि मृत्यूच्या हवालीसुद्धा केले. आपल्या देशातील
सरकारने आणि जनतेने ही उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून, आपले पाय जमिनीवर ठेवून पुढील
धोरणे राबवली पाहिजेत.
यापुढील नियोजन :पोलिओ निर्मूलनामध्ये यापुढील नियोजन करताना
काही महत्वाच्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
१.
नेहमीचे
लसीकरण- प्रत्येक
बालकाच्या जन्मापासून, ते सहा महिन्याचे होईपर्यंत, दरमहा एक असे सहा पोलिओ लशीचे
तोंडाद्वारे देण्याचे डोस यापुढे देखील अनेक वर्षे दिलेच पाहिजेत. त्यानंतर बाळ
दीड वर्षाचे आणि साडेचार वर्षाचे झाल्यावर त्याला बूस्टर डोस न विसरता दिले गेलेच
पाहिजेत.
२.
पल्स
पोलिओ- जेंव्हा जेंव्हा ‘राष्ट्रीय
पल्स पोलिओ दिवस’ जाहीर होईल, तेंव्हा पाच वर्षाखालील प्रत्येक भारतीय बालकाला न
चुकता पोलिओची मौखिक लस द्यायलाच पाहिजे. या बरोबरच काही विशिष्ट प्रभागांमध्ये
त्या प्रभागांपुरती पल्स पोलिओ लशीची मोहीम आखली जाते, तेंव्हादेखील ही लस एकूण-एक
बालकाला दिली गेले पाहिजे.

आपण पोलिओ विरुद्ध आखलेल्या
मोहिमेच्या अंतिम रेषेपर्यंत आलो आहोत. यावेळेस जर आपण गाफील राहिलो आणि ही मोहीम
अट संपली अशा भ्रमात राहिलो तर पोलिओच्या साथीचा जो नवा उद्रेक होईल, त्यात
दरवर्षी जगभरातील दोन लाखाहून अधिक बालके अपंग होत राहतील. तेंव्हा सावधान! पोलिओ
संपलेला नाही.
-डॉ.अविनाश भोंडवे
माजी अध्यक्ष आय.एम्.ए.,पुणे शाखा,
पोलिओ कमिटी अध्यक्ष,
रोटरी इंटर इंटरनॅशनलन डिस्ट्रिक्ट ३१३१
सुपरबगचा हाहाःकार आणि नव्या दिल्लीचा नवा विषाणू
मे महिन्याच्या अखेरीस जर्मनीमध्ये हाहाःकार उडाला. एक हजाराहून अधिक जण अन्नामधून झालेल्या विषबाधेने आजारी पडले होते आणि त्यातले ४७० जण अत्यवस्थ होते. हे सारे रुग्ण इ. कोलाय नावाच्या जंतूंनी बाधित झाले होते आणि या जंतूंवर कुठल्याही प्रतिजैविकाचा (अँटिबायोटिक्सचा) परिणाम होत नव्हता. सर्व प्रतिजैविके पचवणार्याग या जिवाणूंची सर्व जर्मनीच नव्हे, युरोप नव्हे, तर साऱ्या जगानेच धास्ती घेतली. जर्मनीतल्या या सगळया घटनांचं आणि साथीचं खापर फोडलं गेलं, ते स्पेनमधून आलेल्या काकड्यांवर, जर्मनीमध्येच पैदास झालेल्या टोमॅटो आणि लेट्युसवर. आरोग्याबाबत अतिशय दक्ष असणार्याे या युरोपियनांनी लगेच स्पेनविरुद्ध भांडण काढलं, लेट्युस आणि टोमॅटोची शेतं त्वरेने उध्वस्त केली गेली. काकड्या, टोमॅटो, लेट्युस वगैरे विकायला आणि खायला तातडीने बंदी घातली गेली. वेगवेगळ्या नामांकित प्रयोगशाळेतले तज्ञ आले, डॉक्टर्स आले, त्यांनी खूप तपासण्या केल्या, संशोधन केले आणि जाहीर केले की ही साथ पसरली ती मोड आलेया कडधान्यांमधून. परवा १० जूनला काकड्या, टोमॅटो, लेट्युस यांच्यावरील बंदी उठवली गेली आणि स्पेनच्या शेतकऱ्यांना लाखो युरोंची भरपाई देण्याचे मान्य केले गेले.
जर्मनीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूला, ज्याचं शास्त्रीय नाव इ. कोलाय (Escherichia coli) आहे, त्यालाच म्हणतात सुपरबग ! या इ. कोलायसारखेच, कुठल्याही प्रतिजैविकाचा परिणाम न होणाऱ्या काही जीवाणूंचा एक गट संशोधकांनी शोधून काढलाय आणि त्या गटाचं नामकरण केलंय, न्यू दिल्ली मेटॅलो-बीटा-लॅक्टॅमेज किंवा NDM-1.
या एन्.डी.एम्.-१ गटाचा शोध २००९च्या डिसेंबरमध्ये लावला गेला. एन्.डी.एम्. गटाच्या जीवाणूंनी बाधित झालेले रुग्ण भारत,पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रामुख्याने आढळले आहेत. २००८ पासून या जन्तूंवर शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरू आहे.
हा एन्.डी.एम्. म्हणजे जीवाणूंमधील एक असे गुणसूत्र (gene) असते, की ज्यामुळे ते जीवाणू, बीटा-लॅक्टम असलेल्या प्रतिजैविक औषधांना, म्हणजे कार्बेपेनेमसारख्या औषधांना पचवू शकतात. ही बीटा-लॅक्टम प्रतिजैविके (Cabepenem), एरवीच्या साध्या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्यासाठी वापरली जातात; परंतु आता हे एन्.डी.एम्. जातीचे जीवाणू या बीटा-लॅक्टम असलेल्या प्रतिजैविकांनादेखील जुमानत नसल्याने हे जीवाणू अजरामर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यात भर म्हणून की काय संशोधनात असे ही सिद्ध झालेय की हे एन्.डी.एम्. जीवाणू इतर कुठल्याही जीवाणूंपेक्षा किती तरी अधिक गतीने रुग्णांच्या शरीरात वाढत जातात. नेमक्या याच गोष्टींमुळे या जीवाणूंचा संसर्ग झाला, तर रुग्णास या जगातले कुठलेही औषध लागू होणार नाही आणि मग या एन्.डी.एम्. जीवाणूंची एखादी साथ जर आली तर काय भीषण परिस्थिती निर्माण होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
या एन्.डी.एम्.-१ गटामध्ये येणाऱ्या जंतूंची नामावली जर आपण पाहिली तर त्यामध्ये, इ. कोलाय बरोबर क्लेब्सिएला न्युमोनीई हे मुख्य जंतू आहेत. ई.कोलाय प्रामुख्याने आतड्याच्या आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये आढळतो, तर क्लेब्सिएला हा फुफ्फुसाच्या आणि मूत्रमार्गाच्या आजारांना कारणीभूत ठरतो. तसेच स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, एंटरोकॉकस, सुडोमोनाज, क्लॉस्ट्रिडियम, साल्मोनेला अशा प्रकारचे जीवाणूदेखील यात अंतर्भूत होतीत.
नवी दिल्लीतल्या घडामोडी
ऑगस्ट २०१० मध्ये, दिल्लीतल्या काही इस्पितळातील अतिदक्षता विभागात हे जीवाणू असल्याची खबर ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जगाला दिली होती. या इस्पितळांत इतर विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्येदेखील हे जीवाणू सापडले होते. पण त्यानंतर ‘लँसेट’ य वैद्यकीय संशोधनाला वाहून घेतलेल्या जागतिक दर्जाच्या मासिकामध्ये, ऑगस्ट २०१० च्या अंकात, हे एन्.डी.एम्.-१ गटातले जीवाणू दिल्ली शहरातील पिण्याच्या पाण्यातदेखील पसरलेले आहेत असे साधार दाखवून दिले. हे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याद्वारे, घराघरात पुरवले जात आहे आणि त्यामुळे हे जंतू दिल्लीच्या आम जनतेच्या नसानसात वावरत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये अतिसार,हगवण,कॉलरा अशांसारखे आजार होत आहेत.
या शास्त्रज्ञांनी दिल्लीतल्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक नळातून ५०, तर सांडपाण्यातून १७१ नमुने घेतले. पिण्याच्या पाण्यात ५० पैकी फक्त दोन तर सांडपाण्यातून १७१ पैकी ५१ नमुन्यांमध्ये हे जंतू आढळून आले. परंतु काही काळजी निर्माण करणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आल्या. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या जिवाणूंनी सुमारे २० नव्या प्रकारच्या जीवाणूंमध्ये, त्यांचे प्रतिजैविक औषधे पचवण्याचे गुणधर्म पसरवले आहेत. या २० जीवाणूंमध्ये यापूर्वी हे गुणधर्म अस्तित्वात नव्हते. या नव्या जीवाणूंत अतिसार आणि पटकीचे जंतू आहेत. म्हणजे विचार करा अशा जंतूंचा संसर्ग झाला तर होणाऱ्या जुलाबांच्या आजारामध्ये कुठलेही औषध लागू पडणार नाही आणि आणि रुग्णाचा मृत्यू अटळ ठरेल.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे दिल्लीतले एन्.डी.एम्.-१ गटामध्ये मोडणार्याश या जंतूंचा प्रसार. हा प्रसार ३० सेल्सिअस तपमानामध्ये अतिशय वेगाने होतो आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की दिल्लीचे तपमान सर्वसाधारणपणे, एप्रिल ते ऑक्टोबर या काळात, म्हणजे वर्षातले ७ महिने, ३० अंशांच्या आसपासच असते. याचा अर्थच हा की या जन्तूंचा येत्या काही काळात वेगाने प्रसार होणार आहे. सर्व साधारणपणे ३० ते ३६ अंश भारतातल्या इतर शहरात आणि त्याचप्रमाणे जगात देखील याचा प्रसार होण्यास फार वेळ लागणार नाही, हे उघड आहे. आपल्या देशात आजही ६५ कोटी नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळत नाही आणि त्याहूनही जास्त लोकांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नाही.
‘लँसेट’ने त्यांच्या शोध निबंधात अशी निखळ सूचना दिली आहे की कुठल्याही प्रतिजैविकाला भीक न घालणाऱ्या या जिवाणूंचा सर्व जगाला गंभीर धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या वर्षीच्या त्यांच्या घोषवाक्यासाठी, प्रतिजैविकांच्या प्रतिरोधाचा सामना करा, असा संदेश निवडला आहे.
दिल्लीच्या आपल्या मायबाप राज्यसरकारने मात्र या सगळ्याच्या विरोधात, दिल्लीतल्या पाण्यात असे जीवाणू नाहीतच, असा निर्वाळा दिला आहे. एव्हढेच नव्हे, तर भारतातल्या वाढत्या ‘वैद्यकीय पर्यटना’मुळे पोटशूळ उठून पाश्चिमात्य देश हा भारताविरुद्ध कट करीत आहेत असा कांगावा केला आहे.
औषधोपचार
आजमितीस तरी या जीवाणूंसाठी खात्रीचा कुठलाच उपाय उपलब्ध नाही. पण कोलिस्टिन हे जुने औषध आणि टायगेसायक्लिन हे नवे प्रतिजैविक या एन्.डी.एम्. गटाच्या जीवाणूंनी बाधित झालेल्या रुग्णांमध्ये उपचारास थोडेफार उपयुक्त ठरू शकतात. मात्र खेदाची बाब अशी की जगातील कुठलीही संशोधन संस्था, तसेच औषध कंपनी या जीवाणूंसाठी उतारा शोधण्याच्या तयारीत नाही. अशी भीती देखील व्यक्त केली जाते आहे की, या जीवाणूंचा उदय म्हणजे वैद्यकीय शास्त्रातील प्रतिजैविक युगाचा अस्त होण्याचीच चिन्हे आहेत.
एन्.डी.एम्.-१ जीवाणूंबद्दल जगभर होत असलेली चर्चा, त्यांच्याबद्दलची भीती, भविष्यात होऊ शकणाऱ्या जीवितहानीचे भय, असंख्य आडाखे, हे सारे एक वातावरण निर्मिती आहे. जगातल्या मोठ्या आणि बलाढ्य औषध कंपन्यांनी केलेला हा फुगवून आणि वाढवून सांगितलेला प्रचार आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. तसं पाह्यला गेलं तर ही शक्यतादेखील नाकारता येत नाही, कारण काही तरी नवे औषध किंवा नवे प्रतिजैविक आणण्याआधीची ही रसनिर्मिती सुद्धा असू शकते. कारण अशी भयकारक वातावरण निर्मिती करायची आणि कुठलेतरी नवे औषध खूप महाग किंमत लावून बाजारात आणायचे, असे बऱ्याचदा घडले आहे. अगदी विषमज्वराच्या औषधापासून ते परवाच्या स्वाईनफ्लूच्या औषधापर्यंत साऱ्या जगाने हे अनुभवले आहे.
प्रतिबंधक काळजी आणि उपाय
सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यालये, दुकाने, मॉल्स, इस्पितळे, शाळा, कॉलेजेस अशा जागी जिथे सर्वसाधारणपणे लोकांचे हात लागतात अशा जागा म्हणजे दरवाजे,टेबले, जिन्यांचे कठडे, लिफ्टचे दरवाजे आणि त्याच्या मुठी, तशीच आतली बटणे; मॉल्समधील शॉपिंग कार्टस्- बास्केट्स; कार्यालयांमधील कॉम्प्युटर्स, माउस, कीबोर्ड्स, फोन्स; हॉस्पिटल्समधील बसण्याचे बाक, रुग्णांसाठी असलेल्या स्ट्रेचर्स इत्यादी वस्तू आणि सर्वसाधारणपणे सर्वांचा स्पर्श होऊ शकतो अशा गोष्टी, लायसॉल किंवा सॅव्हलॉन सारख्या औषधाने निर्जंतुक कराव्यात.
वैयक्तिक व्यवहारात प्रत्येकाने सतत हात साबणाने धुतले पाहिजेत, त्यासाठी लिक्विड साबण किंवा सॅनिटायझर वापरल्यास उत्तम. घरामध्ये लायसॉलसारख्या औषधाने फारशी पुसून घ्यावी. यदा कदाचित जर अशी साथ आलीच, तर चेहेर्यामवर मास्क वापरणे आवश्यक ठरेल. गर्दीची ठिकाणे, आजारी व्ताक्तीच्या घरी जाणे टाळावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परदेश प्रवास टाळावा. बाहेरील खाणे, सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिणे प्रकर्षाने टाळावे.
प्रतिजैविक औषधांचा अतिरेक टाळा
शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट. आपल्या देशात साध्या सर्दी पडशासाठी प्रतिजैविके घेतली जातात. झटपट गुण पाहिजे अशी पेशंट्सची अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात डॉक्टरवर्गाकडून अनाठाई ती दिलीही जातात. प्रतिजैविक औषधांना प्रतिरोध निर्माण होण्यास आणि जंतूंनी ती पचवण्यात, ही गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्यामध्ये परत दिलेली औषधे पूर्ण न करता, थोडे बरे वाटले की ती औषधे रुग्ण बंद करतो. काही सुशिक्षित लोक मनानेच काही औषधे परस्पर घेतात, ती योग्य डोस आणि आवश्यक अवधीचा विचार न करता घेतात. औषधाचे दुकानदारदेखील डॉक्टरांची चिट्ठी नसताना प्रतिजैविके देतात. या साऱ्या गोष्टींचा परिपोष औषधांच्या प्रतिरोधात होतो. आज फक्त नवी दिल्लीच्या नावाने जगभर फिरणारा आणि भारताच्या राजधानीला वैद्यकीय विश्वात कुप्रसिद्ध करणारा हा जीवाणू जन्माला आलाय, पण आपण या सवयी बदलल्या नाहीत, तर आपल्या प्रत्येक शहराच्या, अगदी पुण्याच्या नावाचे विषाणूसुद्धा अस्तित्वात यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक सुजाण नागरिकाने आणि डॉक्टरांनीसुद्धा याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, हे मात्र खरं.
----------डॉ. अविनाश भोंडवे

-बदलले पुणे,बदलले डॉक्टर्स, बदलले रुग्ण
दुनिया बदले, मौसम बदले, धरती अपनी साडी बदले,
तुम बदलो पगडी...
कल आज और कल के पल पल जुडती जाये कडी .....
राज कपूरच्या कल आज और कल सिनेमातल्या या गाण्याप्रमाणेच गेली पन्नास
वर्षात पुण्याचे हवामान बदलले,वस्ती बदलली, लोक बदलले आणि त्यांच्या प्रमाणेच
डॉक्टर्स,हॉस्पिटल्स आणि रुग्ण देखील बदलले.
१९६० पर्यन्त पुण्यातील वैद्यकीय सेवा कांही
मोजके फॅमिली डॉक्टर्स आणि ताराचंद हॉस्पिटल, के.इ.एम्.हॉस्पिटल, ससून आणि काही
छोटी रुग्णालये, प्रसूतिगृहे एवढीच मर्यादित होती. जनरल प्रॅक्टिस करणारे बहुसंख्य
डॉक्टर्स एल.सी.पी.एस.,जी.एफ.ए.एम्.,एम्.बी.बी.एस. असेच होते. त्यांचे दवाखाने
रुग्णांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असायचे. तिथली ट्रीटमेंट म्हणजे कमीत कमी औषधे
आणि घरगुती उपायांचे सल्ले असायचे. म्हणजे पोट दुखले तर ओव्याने शेका, ताप आला तर गार
पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा, घसा दुखला तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
त्याच बरोबर पित्तासाठी तिखट कमी खा, दूध प्या, जुलाब कमी व्हायला केळी खा ,सफरचंदाचा गर उकडून घ्या...वगैरे
खाण्यापिण्याबाबतचे सल्ले असायचे. दवाखाना संपल्यावर डॉक्टर बऱ्याचदा जे खूप आजारी
असलेल्या पेशंट्सच्या घरी व्हिजिटला जायचे. डोक्यावर हॅट, अंगावर कोट,कडक
इस्त्रीची बहुधा क्रीम कलरची पँट खोचलेला पांढरा शर्ट, पायात बूट किंवा कडक
चामड्याचे सँडल्स, एका हातात ती पूर्वीची सुप्रसिद्ध वेगळीच रचना असलेली व्हिजिट
बॅग अशा जामानिम्यात डॉक्टरांची स्वारी निघायची. रुग्णाचे घर जवळच असेल तर हातात
छत्री घेऊन पायीच आणि लांब असेल तर रुग्णाचा नातेवाईक टांगा घेऊन डॉक्टरांना
न्यायला आलेला असायचाच. क्वचित प्रसंगी सायकल किंवा लँब्रेटासारखी आता इतिहासजमा
झालेली गाडी असायची.त्या काळात डॉक्टर रुग्णांची सेवा करायचे आणि सारा समाज, सारे
रुग्ण डॉक्टरांना देव मानायचा आणि देवाचा शब्द अंतिम असायचा त्याला प्रतिवाद
नसायचा!
पण हळू हळू सारे बदलत गेले. स्पेशालिस्ट
डॉक्टरांची संख्या वाढली.वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे बदल होत गेले आणि वेगवेगळ्या
शारीरिक आजारांचे तज्ञ आले. त्यानंतर साहजिकच सुपर स्पेशालिस्ट आले. आधी फक्त
फिजिशियन होते मग हृदयरोग,मधुमेह,मानसरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ असे प्रकार आले. आधी
फक्त सर्जन होते,मग पोटाचे,छातीचे,मूत्रपिंडाचे तज्ञ आले. दुर्बिणीने शस्त्रक्रिया
होऊ लागल्यावर वेगवेगळया आजारांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी त्यातलेसुद्धा तज्ञ उपलब्ध
झाले. आधी फक्त अस्थिरोग तज्ञ होते मग हाडांच्या फ्रॅक्चरचे वेगळे,मणक्यांचे
वेगळे, अस्थिरोपण करणारे आणखीनच वेगळे उच्च शिक्षित तज्ञ निर्माण झाले. साध्या
डोळ्यांच्या बाबतीतसुद्धा मोतीबिंदूचे, डोळ्याचा नंबर कमी करणारे, दृष्टिपटलाचे,
डोळ्यातल्या अंतर्भागाचे, असे वेगवेगळे तज्ञ दिसू लागले. क्ष-किरण तज्ञांमध्ये
साध्या एक्स-रेचे, स्पेशल इन्वेझिव्ह प्रोसीजरचे, सोनोग्राफीचे, सिटीस्कॅनचे,
एम्.आर.आय.चे, अशा असंख्य शाखा आणि उपशाखा निर्माण झाल्या. आधी डॉक्टरांच्या पॅथॉलॉजी
लॅब्ज होत्या, मग डायग्नोस्टिक सेंटर्स दिसू लागली.
पूर्वी फिजीशियनचे वेगळे, सर्जनचे वेगळे,प्रसुतीसाठी वेगळी अशी
प्रत्येक शाखेची स्वतंत्र इस्पितळे होती. ससून,के.इ.एम्. अशी सोडता तुरळक
सर्वसाधारण रुग्णालये असत; परंतू सत्तरीच्या दशकापासून सर्व सेवा एकत्रित देणारी इस्पितळे
वाढली आणि आता तर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल हा तर नियमच झालाय. १५० ते ५००
खाटांची बहुमजली रुग्णालयांची संख्या लक्षणीय रित्या वाढली. एका डॉक्टरने हॉस्पिटल
काढणे बंद झाले आणि वेगवेगळ्या डॉक्टरांच्या समुहाने असे रुग्णालय काढणे सर्रास
सुरू झाले. भारतातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या उदयानंतर तर कार्पोरेट हॉस्पिटल्सची
रांगच लागली.
स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या जस-जशी वाढू लागली तास तशी फॅमिली
डॉक्टरांच्या संख्येत आणि त्यांच्याकडच्या रुग्णांमधील संख्येत जाणवण्याएवढा फरक
पडला. बी.ए.एम्.एस.;बी.एच.एम्.एस. अशा पदवीधारक डॉक्टरांची संख्या वाढली. साऱ्या
एम्.बी.बी.एस. डॉक्टरांनी पदव्युत्तर शिक्षण घेणे पसंत केल्याने त्या शाखेचे
फॅमिली डॉक्टर विरळाच दिसू लागले. औषधे,काढे,चूर्ण पुडीतून किंवा डोसेजची पट्टी
लावलेल्या बाटलीतून देण्याऐवजी रेडीमेड गोळ्या आणि सीलबंद बाटल्या देण्याची
सुरुवात झाली. आणि आतातर फक्त औषधांची चिट्ठी रुग्णाला देऊन तपासणी फी आकारणे आणि
अत्यवस्थ रुग्णाला इस्पितळांचा मार्ग दाखवणे एवढेच काम फॅमिली डॉक्टर करताना
दिसतात.
पुण्याच्या सभोवती जस-जशी कारखान्यांची भरभराट होऊ लागली, व्यापारात
समृद्धी येऊ लागली तास-तशी लोकांची फॅमिली डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तज्ञ
डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला. प्रत्येक आजाराचे तज्ञ गल्लो-गल्ली उपलब्ध
झाल्याने, ज्या अवयवाचा त्रास असेल त्याविषयीच्या तज्ञांना दाखवणे रुग्णांना
सोयीचे वाटू लागले. त्यातच एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन विभक्त कुटुंबे
निर्माण झाल्याने कुटुंब-वैद्य म्हणजेच फॅमिली डॉक्टर ही संस्था मोडकळीस आली.
यामुळे तज्ञ डॉक्टरांकडे रुग्णांची आता तुडुंब गर्दी दिसू लागली. त्यातच विविध
कंपन्यांतील वैद्यकीय बिलाच्या परतफेडीच्या सुविधांमुळे आणि मेडिक्लेमसारख्या
आजारपणाच्या विम्यांमुळे सर्व-सामान्य जनतेमध्ये इस्पितळात दाखल होऊन उपचार घेणे
सोयीचे होऊ लागले. त्यामुळे खाजगी रुग्णालयांकडील ओघ खूपच वाढला. इतका की आज एवढी
मोठमोठी इस्पितळे असूनसुद्धा बऱ्याच रुग्णालयामध्ये बाराही महिने खाटाच शिल्लक
नसतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आणि जनतेच्या या विचार प्रवृत्तीमुळे
जवळ जवळ साऱ्या रुग्णालयांनी आपल्या विस्तार योजना अमलात आणल्या.
या सगळ्या यांत्रिकीकरणाचा आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून
डॉक्टरना देव मानणे संपले. नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या कायद्याने डॉक्टर आणि
रुग्ण यांच्यातील संबंध ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले. रुग्ण आणि डॉक्टर दोन्ही
वर्ग सेवेपेक्षा पैशांना, ज्ञानापेक्षा महागड्या तपासण्यांना अधिक महत्व देऊ
लागले. एकीकडे रुग्णालयाकडून, दुसऱ्या डॉक्टरकडून
कमिशन घेणारा डॉक्टर दिसू लागला, तर त्याचवेळेस खोटी बिले घेऊन आपण काम
करतो त्या कंपनीला आणि विमा कंपनीला लुबाडणारा चाकरमानी रुग्णवर्ग निर्माण झाला.
रुग्णांकडून डॉक्टरांवर खटले होऊ लागले, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना दमदाटी, मारहाण,
रुग्णालयाची मोडतोड अशा घटना वारंवार घडू लागल्या.
वैद्यकीय सेवेचा महत्वाचा एक भाग म्हणजे औषधे आणि औषधाची दुकाने. पन्नास
वर्षात औषध शास्त्रात प्रचंड क्रांती होत गेली. वेगवेगळ्या आजारांवरची नवनवी औषधे
आली. येतच राहिली. महागडी औषधे देणारा डॉक्टर म्हणजे मोठा डॉक्टर असे मानणारा वर्ग
तयार झाला आणि महाग औषधे म्हणजे उत्तम औषधे असं मानणारा वैद्यक समाजदेखील उभा
झाला. औषध कंपन्यांकडून पूर्वी नुसती माहिती आणि औषधाची सँपलच मिळायची, पण आता
परदेश वाऱ्या, महागड्या भेटवस्तू आणि वेळप्रसंगी रोख रक्कमदेखील मिळायला लागली. ‘वेष
असावा साधाभोळा पण अंतरंगी नाना कळा’ अशा वर्णनाचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड
गेले आणि उत्तम चारचाकी, महागडे पेहराव, सारी लेटेस्ट गॅजेट्स, आलिशान घर, उच्च
राहणीमान या गोष्टींच्या विळख्यात सापडलेल्या आणि सिनेमातल्या नटाप्रमाणे
राहणाऱ्या पेज थ्री डॉक्टरांचा जमाना दिसू लागला.
एकूणच समाजातल्या ढासळत्या नैतिकते बरोबर डॉक्टरांची प्रतिमा घसरत
गेली. झगमगाट वाढला,पण पावित्र्य नष्ट झाले. रुग्णालयांच्या इमारतींची उंची वाढली,
पण त्या इमारतीच्या आतील माणुसकी कमी झाली. नवनवीन उपचार आले, पण गरीब वर्ग
त्यापासून दूरच होत राहिला. सारे पुणे बदलत गेले तसे डॉक्टरांचे राहणीमान,
आचार-विचार, त्यांची जीवनपद्धती सारेच बदलत गेले.सारा समाजच पोकळ आणि दिखाऊ
गोष्टींना महत्व देऊ लागला. वैद्यकीय समाज याला अपवाद होऊ शकला नाही. आज समाजाच्या
बदलेल्या जीवनपद्धती, त्यांचे आमूलाग्र बदललेले आदर्श, माणुसकीपेक्षा पैशाला आलेले
त्यांच्या जीवनातले महत्व, यामध्ये डॉक्टरवर्ग वेगळा राहू शकत नाही. आणि रुग्ण
म्हणजे तर समाजच! त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वीची डॉक्टरची देवत्वाची मूर्ती
आजच्या घडीला पूर्णच भंग पावलेली आहे आणि विशेष म्हणजे भक्तानेही पावित्र्य त्यजले
आहे. हे परिवर्तन चांगले की वाईट , योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल कारण, या
विश्वात एकाच गोष्ट आहे चिरंतन, परिवर्तन आणि परिवर्तन!
-----डॉ.अविनाश भोंडवे
Subscribe to:
Posts (Atom)