Friday, February 1, 2013

पोलिओ संपलेला नाही


पोलिओ संपलेला नाही

मानव वंशाचा इतिहास जसा असंख्य संहारक लढायांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक प्राणघातक साथीच्या रोगांवर माणसाने मिळवलेल्या विजयांनी व्यापलेला आहे. देवी, क्षयरोग, विषमज्वर, मलेरिया, प्लेग, स्वाईन फ्लू अशा आजारांवर शास्त्रज्ञांनी परिणामकारक औषधे शोधून काढली. पोलिओ हा या मालिकेमधलाच, लहान अश्राप मुलांना पांगळे  करणारा, एक भयानक असा साथीचा आजार आहे.

पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू बालकांच्या शरीरात अन्न-पाण्याद्वारे शिरतो आणि त्याचा मेंदू, मज्जारज्जू, चेतातंतू यांना बाधित करून त्याचे पाय कायमचे पांगळे करून टाकतो. हा आजार झाल्यास बालकाचे पांगळेपण टाळायला कुठलाही औषधोपचार नाही आणि त्यामुळेच हा आजार होण्याआधीच योग्य प्रकारे प्रतिबंधक लस घेतली तर हा आजार टळू शकतो. लसीकरण हाच या आजारावर मात करण्याचा मूलमंत्र आहे हे जगभर सिद्ध झाले आहे.

प्राचीन इजिप्त देशाच्या इतिहासात पोलिओची नोंद आहे.तेंव्हापासून आतापावेतो लाखो बालकांना या आजाराने पांगले केले आणि तितक्याच बालकांना प्राण देखील गमवावे लागले. १९८५ पासून जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल, सी.डी.सी. आणि जगभरातली सरकारे यांच्या अथक एकत्रित प्रयत्नाने, जो आजार अमेरिके सारख्या प्रगत देशापासून आफ्रिकेतल्या अतिशय गरीब आणि आशियातल्या युद्धग्रस्त देशांपर्यंत पसरला होता, तो  आज फक्त मोजक्या तीन राष्ट्रातच शिल्लक राहिला आहे. १९८८ साली जगभरात एकूण १२५ देशातली साडेतीन लाख बालके व्याधिग्रस्त होती तर २०१२ मध्ये फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायजेरिया या तीन देशातच  हा रोग शिल्लक राहिला आहे, आणि फक्त काही शेकड्यात याची व्याप्ती उरली आहे.

१९९५ पासून नेटाने सुरू झालेल्या प्रयत्नात आपण कधी यशस्वी होऊन पोलिओचे रुग्ण कमी होत होते, तर अचानक बिहार,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश राजस्थान या राज्यामध्ये वाढून एक चिंतेचे वातावरण निर्माण होत होते. परंतु,१३ जानेवारी २०११ पासून गेल्या एकवीस महिन्यात भारतात पोलिओचा एकदेखील रुग्ण आढळलेला नाही. २५ फेब्रूवारी २०११ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नांव वगळले. ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने विशेषतः साऱ्या पोलिओच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जाज्वल्य अभिमानाची घटना आहे. यामध्ये पोलिओ निर्मूलनासाठी काम करणारे सर्व सरकारी डॉक्टर्स, कर्मचारी, आंगणवाडी कार्यकर्ते, रोटरीचे लाखो स्वयंसेवक, धार्मिक संघटना आणि त्यांचे उर्ध्वयू यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. पंचवीस-सव्वीस वर्षांच्या पोलिओ निर्मूलनाच्या निरपेक्ष आणि निस्वार्थी चळवळीमधूनच हे साध्य होऊ शकले आहे.

पण सावधान!! पोलिओ संपलेला नाही. आज जगाच्या पाठीवर काही देशांमध्ये तो अस्तित्वात आहे. पोलिओचा विषाणू, जो पर्यंत या पृथ्वीतलावरून नष्ट होत नाही तो पर्यंत हा लढा आपण लढणं नितांत गरजेचे आहे. ताजिकिस्तान आणि चीन या सारख्या देशात अनेक वर्षे हा आजार लुप्त झाला, तिथल्या जनतेने निश्वास टाकला, पण पुन्हा पोलिओने तिथे उठाव केला आणि असंख्य बालके नुसती पांगळीच नाही; तर मृत्युमुखीदेखील पडली. नोव्हेंबर २०१० मध्ये ताजिकिस्तान आणि सप्टेंबर २०११ मध्ये चीनमध्ये, अंतर्धान पावलेल्या या विषाणूंनी पुन्हा उद्रेक केला आणि शेकडो बालकांना पोलिओने अपंग केले आणि मृत्यूच्या हवालीसुद्धा केले. आपल्या देशातील सरकारने आणि जनतेने ही उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून, आपले पाय जमिनीवर ठेवून पुढील धोरणे राबवली पाहिजेत.

यापुढील नियोजन :पोलिओ निर्मूलनामध्ये यापुढील नियोजन करताना काही महत्वाच्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

१.      नेहमीचे लसीकरण- प्रत्येक बालकाच्या जन्मापासून, ते सहा महिन्याचे होईपर्यंत, दरमहा एक असे सहा पोलिओ लशीचे तोंडाद्वारे देण्याचे डोस यापुढे देखील अनेक वर्षे दिलेच पाहिजेत. त्यानंतर बाळ दीड वर्षाचे आणि साडेचार वर्षाचे झाल्यावर त्याला बूस्टर डोस न विसरता दिले गेलेच पाहिजेत.

२.      पल्स पोलिओ- जेंव्हा जेंव्हा ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ दिवस’ जाहीर होईल, तेंव्हा पाच वर्षाखालील प्रत्येक भारतीय बालकाला न चुकता पोलिओची मौखिक लस द्यायलाच पाहिजे. या बरोबरच काही विशिष्ट प्रभागांमध्ये त्या प्रभागांपुरती पल्स पोलिओ लशीची मोहीम आखली जाते, तेंव्हादेखील ही लस एकूण-एक बालकाला दिली गेले पाहिजे.

३.      पोलिओचा संशयित रुग्ण कळवणे- पंधरा वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला जर ताप,जुलाब होऊन त्याच्या हातापायांमध्ये जर लकवा भरला असेल तर या रुग्णाची माहिती संबधित डॉक्टरांनी, त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी किंवा कुणीही सुजाण नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरकारी डॉक्टरांना कळवले पाहिजेत. या बाबतीत आपण थोडे मागे पडत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार येती काही वर्षे आपण पोलिओचे संशयित रुग्ण यापद्धतीने कळवत राहिल्यास, त्या रुग्णाची सर्व मोफत तपासणी राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये अतिशय उच्च पातळीवर होऊन पोलिओ विषाणूचा पूर्ण थांग लावला जातो. या पृथ्वीवरून शेवटचा पोलिओ विषाणू नष्ट होईतो ही मोहीम सुरु ठेवलीच पाहिजे.

आपण पोलिओ विरुद्ध आखलेल्या मोहिमेच्या अंतिम रेषेपर्यंत आलो आहोत. यावेळेस जर आपण गाफील राहिलो आणि ही मोहीम अट संपली अशा भ्रमात राहिलो तर पोलिओच्या साथीचा जो नवा उद्रेक होईल, त्यात दरवर्षी जगभरातील दोन लाखाहून अधिक बालके अपंग होत राहतील. तेंव्हा सावधान! पोलिओ संपलेला नाही.

                                                -डॉ.अविनाश भोंडवे

माजी अध्यक्ष आय.एम्.ए.,पुणे शाखा,

                                   पोलिओ कमिटी अध्यक्ष,
       रोटरी इंटर इंटरनॅशनलन डिस्ट्रिक्ट ३१३१

 
 

No comments:

Post a Comment