Friday, February 1, 2013


-बदलले पुणे,बदलले डॉक्टर्स, बदलले रुग्ण

दुनिया बदले, मौसम बदले, धरती अपनी साडी बदले, तुम बदलो पगडी...

कल आज और कल के पल पल जुडती जाये कडी .....

राज कपूरच्या कल आज और कल सिनेमातल्या या गाण्याप्रमाणेच गेली पन्नास वर्षात पुण्याचे हवामान बदलले,वस्ती बदलली, लोक बदलले आणि त्यांच्या प्रमाणेच डॉक्टर्स,हॉस्पिटल्स आणि रुग्ण देखील बदलले.

      १९६० पर्यन्त पुण्यातील वैद्यकीय सेवा कांही मोजके फॅमिली डॉक्टर्स आणि ताराचंद हॉस्पिटल, के.इ.एम्.हॉस्पिटल, ससून आणि काही छोटी रुग्णालये, प्रसूतिगृहे एवढीच मर्यादित होती. जनरल प्रॅक्टिस करणारे बहुसंख्य डॉक्टर्स एल.सी.पी.एस.,जी.एफ.ए.एम्.,एम्.बी.बी.एस. असेच होते. त्यांचे दवाखाने रुग्णांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असायचे. तिथली ट्रीटमेंट म्हणजे कमीत कमी औषधे आणि घरगुती उपायांचे सल्ले असायचे. म्हणजे पोट दुखले तर ओव्याने शेका, ताप आला तर गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा, घसा दुखला तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. त्याच बरोबर पित्तासाठी तिखट कमी खा, दूध प्या, जुलाब कमी व्हायला केळी  खा ,सफरचंदाचा गर उकडून घ्या...वगैरे खाण्यापिण्याबाबतचे सल्ले असायचे. दवाखाना संपल्यावर डॉक्टर बऱ्याचदा जे खूप आजारी असलेल्या पेशंट्सच्या घरी व्हिजिटला जायचे. डोक्यावर हॅट, अंगावर कोट,कडक इस्त्रीची बहुधा क्रीम कलरची पँट खोचलेला पांढरा शर्ट, पायात बूट किंवा कडक चामड्याचे सँडल्स, एका हातात ती पूर्वीची सुप्रसिद्ध वेगळीच रचना असलेली व्हिजिट बॅग अशा जामानिम्यात डॉक्टरांची स्वारी निघायची. रुग्णाचे घर जवळच असेल तर हातात छत्री घेऊन पायीच आणि लांब असेल तर रुग्णाचा नातेवाईक टांगा घेऊन डॉक्टरांना न्यायला आलेला असायचाच. क्वचित प्रसंगी सायकल किंवा लँब्रेटासारखी आता इतिहासजमा झालेली गाडी असायची.त्या काळात डॉक्टर रुग्णांची सेवा करायचे आणि सारा समाज, सारे रुग्ण डॉक्टरांना देव मानायचा आणि देवाचा शब्द अंतिम असायचा त्याला प्रतिवाद नसायचा!

      पण हळू हळू सारे बदलत गेले. स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या वाढली.वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे बदल होत गेले आणि वेगवेगळ्या शारीरिक आजारांचे तज्ञ आले. त्यानंतर साहजिकच सुपर स्पेशालिस्ट आले. आधी फक्त फिजिशियन होते मग हृदयरोग,मधुमेह,मानसरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ असे प्रकार आले. आधी फक्त सर्जन होते,मग पोटाचे,छातीचे,मूत्रपिंडाचे तज्ञ आले. दुर्बिणीने शस्त्रक्रिया होऊ लागल्यावर वेगवेगळया आजारांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी त्यातलेसुद्धा तज्ञ उपलब्ध झाले. आधी फक्त अस्थिरोग तज्ञ होते मग हाडांच्या फ्रॅक्चरचे वेगळे,मणक्यांचे वेगळे, अस्थिरोपण करणारे आणखीनच वेगळे उच्च शिक्षित तज्ञ निर्माण झाले. साध्या डोळ्यांच्या बाबतीतसुद्धा मोतीबिंदूचे, डोळ्याचा नंबर कमी करणारे, दृष्टिपटलाचे, डोळ्यातल्या अंतर्भागाचे, असे वेगवेगळे तज्ञ दिसू लागले. क्ष-किरण तज्ञांमध्ये साध्या एक्स-रेचे, स्पेशल इन्वेझिव्ह प्रोसीजरचे, सोनोग्राफीचे, सिटीस्कॅनचे, एम्.आर.आय.चे, अशा असंख्य शाखा आणि उपशाखा निर्माण झाल्या. आधी डॉक्टरांच्या पॅथॉलॉजी लॅब्ज होत्या, मग डायग्नोस्टिक सेंटर्स दिसू लागली.

पूर्वी फिजीशियनचे वेगळे, सर्जनचे वेगळे,प्रसुतीसाठी वेगळी अशी प्रत्येक शाखेची स्वतंत्र इस्पितळे होती. ससून,के.इ.एम्. अशी सोडता तुरळक सर्वसाधारण रुग्णालये असत; परंतू सत्तरीच्या दशकापासून सर्व सेवा एकत्रित देणारी इस्पितळे वाढली आणि आता तर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल हा तर नियमच झालाय. १५० ते ५०० खाटांची बहुमजली रुग्णालयांची संख्या लक्षणीय रित्या वाढली. एका डॉक्टरने हॉस्पिटल काढणे बंद झाले आणि वेगवेगळ्या डॉक्टरांच्या समुहाने असे रुग्णालय काढणे सर्रास सुरू झाले. भारतातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या उदयानंतर तर कार्पोरेट हॉस्पिटल्सची रांगच लागली.

स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या जस-जशी वाढू लागली तास तशी फॅमिली डॉक्टरांच्या संख्येत आणि त्यांच्याकडच्या रुग्णांमधील संख्येत जाणवण्याएवढा फरक पडला. बी.ए.एम्.एस.;बी.एच.एम्.एस. अशा पदवीधारक डॉक्टरांची संख्या वाढली. साऱ्या एम्.बी.बी.एस. डॉक्टरांनी पदव्युत्तर शिक्षण घेणे पसंत केल्याने त्या शाखेचे फॅमिली डॉक्टर विरळाच दिसू लागले. औषधे,काढे,चूर्ण पुडीतून किंवा डोसेजची पट्टी लावलेल्या बाटलीतून देण्याऐवजी रेडीमेड गोळ्या आणि सीलबंद बाटल्या देण्याची सुरुवात झाली. आणि आतातर फक्त औषधांची चिट्ठी रुग्णाला देऊन तपासणी फी आकारणे आणि अत्यवस्थ रुग्णाला इस्पितळांचा मार्ग दाखवणे एवढेच काम फॅमिली डॉक्टर करताना दिसतात.

पुण्याच्या सभोवती जस-जशी कारखान्यांची भरभराट होऊ लागली, व्यापारात समृद्धी येऊ लागली तास-तशी लोकांची फॅमिली डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला. प्रत्येक आजाराचे तज्ञ गल्लो-गल्ली उपलब्ध झाल्याने, ज्या अवयवाचा त्रास असेल त्याविषयीच्या तज्ञांना दाखवणे रुग्णांना सोयीचे वाटू लागले. त्यातच एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन विभक्त कुटुंबे निर्माण झाल्याने कुटुंब-वैद्य म्हणजेच फॅमिली डॉक्टर ही संस्था मोडकळीस आली. यामुळे तज्ञ डॉक्टरांकडे रुग्णांची आता तुडुंब गर्दी दिसू लागली. त्यातच विविध कंपन्यांतील वैद्यकीय बिलाच्या परतफेडीच्या सुविधांमुळे आणि मेडिक्लेमसारख्या आजारपणाच्या विम्यांमुळे सर्व-सामान्य जनतेमध्ये इस्पितळात दाखल होऊन उपचार घेणे सोयीचे होऊ लागले. त्यामुळे खाजगी रुग्णालयांकडील ओघ खूपच वाढला. इतका की आज एवढी मोठमोठी इस्पितळे असूनसुद्धा बऱ्याच रुग्णालयामध्ये बाराही महिने खाटाच शिल्लक नसतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आणि जनतेच्या या विचार प्रवृत्तीमुळे जवळ जवळ साऱ्या रुग्णालयांनी आपल्या विस्तार योजना अमलात आणल्या.

या सगळ्या यांत्रिकीकरणाचा आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून डॉक्टरना देव मानणे संपले. नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या कायद्याने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले. रुग्ण आणि डॉक्टर दोन्ही वर्ग सेवेपेक्षा पैशांना, ज्ञानापेक्षा महागड्या तपासण्यांना अधिक महत्व देऊ लागले. एकीकडे रुग्णालयाकडून, दुसऱ्या डॉक्टरकडून  कमिशन घेणारा डॉक्टर दिसू लागला, तर त्याचवेळेस खोटी बिले घेऊन आपण काम करतो त्या कंपनीला आणि विमा कंपनीला लुबाडणारा चाकरमानी रुग्णवर्ग निर्माण झाला. रुग्णांकडून डॉक्टरांवर खटले होऊ लागले, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना दमदाटी, मारहाण, रुग्णालयाची मोडतोड अशा घटना वारंवार घडू लागल्या.

वैद्यकीय सेवेचा महत्वाचा एक भाग म्हणजे औषधे आणि औषधाची दुकाने. पन्नास वर्षात औषध शास्त्रात प्रचंड क्रांती होत गेली. वेगवेगळ्या आजारांवरची नवनवी औषधे आली. येतच राहिली. महागडी औषधे देणारा डॉक्टर म्हणजे मोठा डॉक्टर असे मानणारा वर्ग तयार झाला आणि महाग औषधे म्हणजे उत्तम औषधे असं मानणारा वैद्यक समाजदेखील उभा झाला. औषध कंपन्यांकडून पूर्वी नुसती माहिती आणि औषधाची सँपलच मिळायची, पण आता परदेश वाऱ्या, महागड्या भेटवस्तू आणि वेळप्रसंगी रोख रक्कमदेखील मिळायला लागली. ‘वेष असावा साधाभोळा पण अंतरंगी नाना कळा’ अशा वर्णनाचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड गेले आणि उत्तम चारचाकी, महागडे पेहराव, सारी लेटेस्ट गॅजेट्स, आलिशान घर, उच्च राहणीमान या गोष्टींच्या विळख्यात सापडलेल्या आणि सिनेमातल्या नटाप्रमाणे राहणाऱ्या पेज थ्री डॉक्टरांचा जमाना दिसू लागला.

एकूणच समाजातल्या ढासळत्या नैतिकते बरोबर डॉक्टरांची प्रतिमा घसरत गेली. झगमगाट वाढला,पण पावित्र्य नष्ट झाले. रुग्णालयांच्या इमारतींची उंची वाढली, पण त्या इमारतीच्या आतील माणुसकी कमी झाली. नवनवीन उपचार आले, पण गरीब वर्ग त्यापासून दूरच होत राहिला. सारे पुणे बदलत गेले तसे डॉक्टरांचे राहणीमान, आचार-विचार, त्यांची जीवनपद्धती सारेच बदलत गेले.सारा समाजच पोकळ आणि दिखाऊ गोष्टींना महत्व देऊ लागला. वैद्यकीय समाज याला अपवाद होऊ शकला नाही. आज समाजाच्या बदलेल्या जीवनपद्धती, त्यांचे आमूलाग्र बदललेले आदर्श, माणुसकीपेक्षा पैशाला आलेले त्यांच्या जीवनातले महत्व, यामध्ये डॉक्टरवर्ग वेगळा राहू शकत नाही. आणि रुग्ण म्हणजे तर समाजच! त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वीची डॉक्टरची देवत्वाची मूर्ती आजच्या घडीला पूर्णच भंग पावलेली आहे आणि विशेष म्हणजे भक्तानेही पावित्र्य त्यजले आहे. हे परिवर्तन चांगले की वाईट , योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल कारण, या विश्वात एकाच गोष्ट आहे चिरंतन, परिवर्तन आणि परिवर्तन!

  

-----डॉ.अविनाश भोंडवे

No comments:

Post a Comment