सुपरबगचा हाहाःकार आणि नव्या दिल्लीचा नवा विषाणू

              मे महिन्याच्या अखेरीस जर्मनीमध्ये हाहाःकार उडाला. एक हजाराहून अधिक जण अन्नामधून झालेल्या विषबाधेने आजारी पडले होते आणि त्यातले ४७० जण अत्यवस्थ होते. हे सारे रुग्ण इ. कोलाय नावाच्या जंतूंनी बाधित झाले होते आणि या जंतूंवर कुठल्याही प्रतिजैविकाचा (अँटिबायोटिक्सचा) परिणाम होत नव्हता. सर्व प्रतिजैविके पचवणार्याग या जिवाणूंची सर्व जर्मनीच नव्हे, युरोप नव्हे, तर साऱ्या जगानेच धास्ती घेतली. जर्मनीतल्या या सगळया घटनांचं आणि साथीचं खापर फोडलं गेलं, ते स्पेनमधून आलेल्या काकड्यांवर, जर्मनीमध्येच पैदास झालेल्या टोमॅटो आणि लेट्युसवर. आरोग्याबाबत अतिशय दक्ष असणार्याे या युरोपियनांनी लगेच स्पेनविरुद्ध भांडण काढलं, लेट्युस आणि टोमॅटोची शेतं त्वरेने उध्वस्त केली गेली. काकड्या, टोमॅटो, लेट्युस वगैरे विकायला आणि खायला तातडीने बंदी घातली गेली. वेगवेगळ्या नामांकित प्रयोगशाळेतले तज्ञ आले, डॉक्टर्स आले, त्यांनी खूप तपासण्या केल्या, संशोधन केले आणि जाहीर केले की ही साथ पसरली ती मोड आलेया कडधान्यांमधून. परवा १० जूनला काकड्या, टोमॅटो, लेट्युस यांच्यावरील बंदी उठवली गेली आणि स्पेनच्या शेतकऱ्यांना लाखो युरोंची भरपाई देण्याचे मान्य केले गेले.


                     जर्मनीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूला, ज्याचं शास्त्रीय नाव इ. कोलाय (Escherichia coli) आहे, त्यालाच म्हणतात सुपरबग ! या इ. कोलायसारखेच, कुठल्याही प्रतिजैविकाचा परिणाम न होणाऱ्या काही जीवाणूंचा एक गट संशोधकांनी शोधून काढलाय आणि त्या गटाचं नामकरण केलंय, न्यू दिल्ली मेटॅलो-बीटा-लॅक्टॅमेज किंवा NDM-1.

                   या एन्.डी.एम्.-१ गटाचा शोध २००९च्या डिसेंबरमध्ये लावला गेला. एन्.डी.एम्. गटाच्या जीवाणूंनी बाधित झालेले रुग्ण भारत,पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रामुख्याने आढळले आहेत. २००८ पासून या जन्तूंवर शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरू आहे.

हा एन्.डी.एम्. म्हणजे जीवाणूंमधील एक असे गुणसूत्र (gene) असते, की ज्यामुळे ते जीवाणू, बीटा-लॅक्टम असलेल्या प्रतिजैविक औषधांना, म्हणजे कार्बेपेनेमसारख्या औषधांना पचवू शकतात. ही बीटा-लॅक्टम प्रतिजैविके (Cabepenem), एरवीच्या साध्या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्यासाठी वापरली जातात; परंतु आता हे एन्.डी.एम्. जातीचे जीवाणू या बीटा-लॅक्टम असलेल्या प्रतिजैविकांनादेखील जुमानत नसल्याने हे जीवाणू अजरामर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यात भर म्हणून की काय संशोधनात असे ही सिद्ध झालेय की हे एन्.डी.एम्. जीवाणू इतर कुठल्याही जीवाणूंपेक्षा किती तरी अधिक गतीने रुग्णांच्या शरीरात वाढत जातात. नेमक्या याच गोष्टींमुळे या जीवाणूंचा संसर्ग झाला, तर रुग्णास या जगातले कुठलेही औषध लागू होणार नाही आणि मग या एन्.डी.एम्. जीवाणूंची एखादी साथ जर आली तर काय भीषण परिस्थिती निर्माण होईल याची कल्पनाच न केलेली बरी.

                      या एन्.डी.एम्.-१ गटामध्ये येणाऱ्या जंतूंची नामावली जर आपण पाहिली तर त्यामध्ये, इ. कोलाय बरोबर क्लेब्सिएला न्युमोनीई हे मुख्य जंतू आहेत. ई.कोलाय प्रामुख्याने आतड्याच्या आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये आढळतो, तर क्लेब्सिएला हा फुफ्फुसाच्या आणि मूत्रमार्गाच्या आजारांना कारणीभूत ठरतो. तसेच स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, एंटरोकॉकस, सुडोमोनाज, क्लॉस्ट्रिडियम, साल्मोनेला अशा प्रकारचे जीवाणूदेखील यात अंतर्भूत होतीत.

                                              नवी दिल्लीतल्या घडामोडी

                 ऑगस्ट २०१० मध्ये, दिल्लीतल्या काही इस्पितळातील अतिदक्षता विभागात हे जीवाणू असल्याची खबर ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जगाला दिली होती. या इस्पितळांत इतर विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्येदेखील हे जीवाणू सापडले होते. पण त्यानंतर ‘लँसेट’ य वैद्यकीय संशोधनाला वाहून घेतलेल्या जागतिक दर्जाच्या मासिकामध्ये, ऑगस्ट २०१० च्या अंकात, हे एन्.डी.एम्.-१ गटातले जीवाणू दिल्ली शहरातील पिण्याच्या पाण्यातदेखील पसरलेले आहेत असे साधार दाखवून दिले. हे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याद्वारे, घराघरात पुरवले जात आहे आणि त्यामुळे हे जंतू दिल्लीच्या आम जनतेच्या नसानसात वावरत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये अतिसार,हगवण,कॉलरा अशांसारखे आजार होत आहेत.

                          या शास्त्रज्ञांनी दिल्लीतल्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक नळातून ५०, तर सांडपाण्यातून १७१ नमुने घेतले. पिण्याच्या पाण्यात ५० पैकी फक्त दोन तर सांडपाण्यातून १७१ पैकी ५१ नमुन्यांमध्ये हे जंतू आढळून आले. परंतु काही काळजी निर्माण करणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आल्या. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या जिवाणूंनी सुमारे २० नव्या प्रकारच्या जीवाणूंमध्ये, त्यांचे प्रतिजैविक औषधे पचवण्याचे गुणधर्म पसरवले आहेत. या २० जीवाणूंमध्ये यापूर्वी हे गुणधर्म अस्तित्वात नव्हते. या नव्या जीवाणूंत अतिसार आणि पटकीचे जंतू आहेत. म्हणजे विचार करा अशा जंतूंचा संसर्ग झाला तर होणाऱ्या जुलाबांच्या आजारामध्ये कुठलेही औषध लागू पडणार नाही आणि आणि रुग्णाचा मृत्यू अटळ ठरेल.

                          दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे दिल्लीतले एन्.डी.एम्.-१ गटामध्ये मोडणार्याश या जंतूंचा प्रसार. हा प्रसार ३० सेल्सिअस तपमानामध्ये अतिशय वेगाने होतो आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की दिल्लीचे तपमान सर्वसाधारणपणे, एप्रिल ते ऑक्टोबर या काळात, म्हणजे वर्षातले ७ महिने, ३० अंशांच्या आसपासच असते. याचा अर्थच हा की या जन्तूंचा येत्या काही काळात वेगाने प्रसार होणार आहे. सर्व साधारणपणे ३० ते ३६ अंश भारतातल्या इतर शहरात आणि त्याचप्रमाणे जगात देखील याचा प्रसार होण्यास फार वेळ लागणार नाही, हे उघड आहे. आपल्या देशात आजही ६५ कोटी नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळत नाही आणि त्याहूनही जास्त लोकांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नाही.

                        ‘लँसेट’ने त्यांच्या शोध निबंधात अशी निखळ सूचना दिली आहे की कुठल्याही प्रतिजैविकाला भीक न घालणाऱ्या या जिवाणूंचा सर्व जगाला गंभीर धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या वर्षीच्या त्यांच्या घोषवाक्यासाठी, प्रतिजैविकांच्या प्रतिरोधाचा सामना करा, असा संदेश निवडला आहे.

                         दिल्लीच्या आपल्या मायबाप राज्यसरकारने मात्र या सगळ्याच्या विरोधात, दिल्लीतल्या पाण्यात असे जीवाणू नाहीतच, असा निर्वाळा दिला आहे. एव्हढेच नव्हे, तर भारतातल्या वाढत्या ‘वैद्यकीय पर्यटना’मुळे पोटशूळ उठून पाश्चिमात्य देश हा भारताविरुद्ध कट करीत आहेत असा कांगावा केला आहे.

औषधोपचार

आजमितीस तरी या जीवाणूंसाठी खात्रीचा कुठलाच उपाय उपलब्ध नाही. पण कोलिस्टिन हे जुने औषध आणि टायगेसायक्लिन हे नवे प्रतिजैविक या एन्.डी.एम्. गटाच्या जीवाणूंनी बाधित झालेल्या रुग्णांमध्ये उपचारास थोडेफार उपयुक्त ठरू शकतात. मात्र खेदाची बाब अशी की जगातील कुठलीही संशोधन संस्था, तसेच औषध कंपनी या जीवाणूंसाठी उतारा शोधण्याच्या तयारीत नाही. अशी भीती देखील व्यक्त केली जाते आहे की, या जीवाणूंचा उदय म्हणजे वैद्यकीय शास्त्रातील प्रतिजैविक युगाचा अस्त होण्याचीच चिन्हे आहेत.

                       एन्.डी.एम्.-१ जीवाणूंबद्दल जगभर होत असलेली चर्चा, त्यांच्याबद्दलची भीती, भविष्यात होऊ शकणाऱ्या जीवितहानीचे भय, असंख्य आडाखे, हे सारे एक वातावरण निर्मिती आहे. जगातल्या मोठ्या आणि बलाढ्य औषध कंपन्यांनी केलेला हा फुगवून आणि वाढवून सांगितलेला प्रचार आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. तसं पाह्यला गेलं तर ही शक्यतादेखील नाकारता येत नाही, कारण काही तरी नवे औषध किंवा नवे प्रतिजैविक आणण्याआधीची ही रसनिर्मिती सुद्धा असू शकते. कारण अशी भयकारक वातावरण निर्मिती करायची आणि कुठलेतरी नवे औषध खूप महाग किंमत लावून बाजारात आणायचे, असे बऱ्याचदा घडले आहे. अगदी विषमज्वराच्या औषधापासून ते परवाच्या स्वाईनफ्लूच्या औषधापर्यंत साऱ्या जगाने हे अनुभवले आहे.

प्रतिबंधक काळजी आणि उपाय

                         सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यालये, दुकाने, मॉल्स, इस्पितळे, शाळा, कॉलेजेस अशा जागी जिथे सर्वसाधारणपणे लोकांचे हात लागतात अशा जागा म्हणजे दरवाजे,टेबले, जिन्यांचे कठडे, लिफ्टचे दरवाजे आणि त्याच्या मुठी, तशीच आतली बटणे; मॉल्समधील शॉपिंग कार्टस्- बास्केट्स; कार्यालयांमधील कॉम्प्युटर्स, माउस, कीबोर्ड्स, फोन्स; हॉस्पिटल्समधील बसण्याचे बाक, रुग्णांसाठी असलेल्या स्ट्रेचर्स इत्यादी वस्तू आणि सर्वसाधारणपणे सर्वांचा स्पर्श होऊ शकतो अशा गोष्टी, लायसॉल किंवा सॅव्हलॉन सारख्या औषधाने निर्जंतुक कराव्यात.

                          वैयक्तिक व्यवहारात प्रत्येकाने सतत हात साबणाने धुतले पाहिजेत, त्यासाठी लिक्विड साबण किंवा सॅनिटायझर वापरल्यास उत्तम. घरामध्ये लायसॉलसारख्या औषधाने फारशी पुसून घ्यावी. यदा कदाचित जर अशी साथ आलीच, तर चेहेर्यामवर मास्क वापरणे आवश्यक ठरेल. गर्दीची ठिकाणे, आजारी व्ताक्तीच्या घरी जाणे टाळावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परदेश प्रवास टाळावा. बाहेरील खाणे, सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिणे प्रकर्षाने टाळावे.

प्रतिजैविक औषधांचा अतिरेक टाळा

                            शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट. आपल्या देशात साध्या सर्दी पडशासाठी प्रतिजैविके घेतली जातात. झटपट गुण पाहिजे अशी पेशंट्सची अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात डॉक्टरवर्गाकडून अनाठाई ती दिलीही जातात. प्रतिजैविक औषधांना प्रतिरोध निर्माण होण्यास आणि जंतूंनी ती पचवण्यात, ही गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्यामध्ये परत दिलेली औषधे पूर्ण न करता, थोडे बरे वाटले की ती औषधे रुग्ण बंद करतो. काही सुशिक्षित लोक मनानेच काही औषधे परस्पर घेतात, ती योग्य डोस आणि आवश्यक अवधीचा विचार न करता घेतात. औषधाचे दुकानदारदेखील डॉक्टरांची चिट्ठी नसताना प्रतिजैविके देतात. या साऱ्या गोष्टींचा परिपोष औषधांच्या प्रतिरोधात होतो. आज फक्त नवी दिल्लीच्या नावाने जगभर फिरणारा आणि भारताच्या राजधानीला वैद्यकीय विश्वात कुप्रसिद्ध करणारा हा जीवाणू जन्माला आलाय, पण आपण या सवयी बदलल्या नाहीत, तर आपल्या प्रत्येक शहराच्या, अगदी पुण्याच्या नावाचे विषाणूसुद्धा अस्तित्वात यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक सुजाण नागरिकाने आणि डॉक्टरांनीसुद्धा याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, हे मात्र खरं.

----------डॉ. अविनाश भोंडवे